एकेरी शंभर टन ऊस उत्पादन; असे केले सुधारित व्यवस्थापन!

आपले कष्ट आणि मेहनत प्रामाणिक असेल तर माणूस शून्यातूनही विश्व उभं करू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रगतशील ऊस उत्पादक विनायक लामखडे आहेत. मूळचे मंगरूळ, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील हे रहिवासी आहेत. १२ वर्ष पडीक असलेल्या जमिनीला कसदार बनवून जवळपास २०० टन ऊस उत्पादन होऊ शकतो. असं अनोखं उदाहरण आपल्या सर्वांसमोर उभं करणारा हा बळीराजा. विनायक हे त्यांच्या मूळ गावी मंगरूळ येथे जवळपास ५ ते १० वर्षांपासून ऊसाची शेती करतात. ते फक्त शेतीचं करत नाही तर शेती करताना ते नोकरीही करतात. शेतीला तृतीय दर्जा, अगदी शेवटचा उत्पन्नाचा स्त्रोत समजणाऱ्या या तरुणाई समोर विनायक हे अपवादच आहेत आणि एक प्रेरणाही. जवळजवळ १२ वर्ष पडीक जमीन, ज्यावर मोठं मोठी बाभळीच्या झाडांची वाढ झालेली होती. अश्या २ एकर जमिनीला पोषक बनवून विनायक यांनी ऊस उत्पादन लागवड सुरू केली. १० हजार रोपांच्या माध्यमातून त्यांनी यावर्षीची ऊस लागवड केली. तसेच या शेतीला त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची ही जोड दिली. मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादन घेण्यासाठी त्यांनी काय काय गोष्टी वापरल्या? त्यांचा कशाप्रकारे वापर केला? या बाबत आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम या ऊसाच्या शेतीसाठी त्यांनी ८६०३२ या वाणाचा बेनं वापरलं. योग्य पद्धतीने जमिनीची मशागत करून Atrolation खत, १८४६ सिलिकॉन सहा गोणी आणि पोटॅश ४ गोणी अशा प्रकारचा बेसल डोस ही दिला. दाणेदार स्वरूपात हे सगळं एकत्र मिक्स करून आणि सरीनुसार हाताने ते संपुर्ण लागवडीच्या जमिनीत टाकलं.  आणि नंतर पुन्हा एकदा १ महिन्याने हा डोस त्यांनी पिकांना दिला. शेतीची लागवड ही रोपांच्या स्वरूपात केलेली असल्याने कॅनॉनची ड्रिंचींग ही केली होती. फेब्रुवारी महिन्यात ऐन उन्हाळ्यात लागवड केल्यामुळे जमिनीला पडणारे गाभे ही यामुळे आटोक्यात आले. आणि त्यानंतर पिकांनी मूळ धरायला सुरुवात केली. अशी विनायक यांनी त्यांच्या शेतजमिनीची लागवडी दरम्यान काळजी घेतली. युरियाचाही अगदी कमीतकमी वापर त्यांनी केला. घरचं शेणखत वापरून शेणखताचं गोमूत्र प्रत्येक सरी मध्ये सोडलं यामुळे ऊसाला युरिया टाकावा लागला नाही. त्यातल्या त्यात सेंद्रिय शेती पण झाली आणि परिणामी खर्च कमी झाला. विनायक म्हणतात, “लोक म्हणतात परवडत नाही. पण जर असे वेगवेगळे प्रयोग केले. जेणेकरून आपला खर्च कमी होईल आणि उत्पन्नात वाढही होईल.” या सोबतच ऊसाचं पीक म्हटलं म्हणजे भरमसाठ पाणी तर लागणारच ना? तर या बाबतीतही विनायक नोकरी सांभाळून या सर्वांचं कशाप्रकारे सगळं नियोजन करतात ते बघुया. शेतीला थोडा आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार देऊन त्यांनी वेळही वाचवला आणि योग्य प्रमाणात पिकांना पाणीपुरवठाही केला. आता बाऱ्यावरती तासन् तास उभं राहायची गरज नाही अस सांगत त्यांनी पाईप वापरून त्याला कॉक सिस्टीम तयार केली. मंगरूळ हा परिसर म्हणजे तिथं वाघांची भीती असते आणि रात्री लाईट पण नसते. अशा वेळी आपलं संरक्षण आणि ऊसाची योग्य भरणी यासाठी त्यांनी ही कॉक सिस्टीम केली. ज्यामुळे दिवसाचं ऊसाला पाणी देणं शक्य झालं. एक तुकड्यावर पाच तास पाणी आणि नंतर दुसऱ्या तुकड्यावर कॉक सुरू करायचे असे नियोजन त्यांनी केले. जवळजवळ ६:३० तासात त्यांच्या पूर्ण ऊसाच्या पिकाला पाणी पोहचते. तसेच १५ दिवसाच्या अंतराने पिकांना पाणी दिलं जातं. असं योग्य नियोजन विनायक यांनी केलेलं आहे. पूर्ण काळीशार जमीन असलेल्या या जमिनीवर मीठ फुटत, तण येत पण त्याची काळजीही आपण योग्य पद्धतीने घेतली पाहिजे अस विनायक यांचं म्हणणं आहे.  वेळोवेळी खुरपणी, तण काढणे हे केलंच पाहिजे. त्यामुळे पिकाला देणार पोषण हे तणाला न जाता पिकाला जाईल अस ते म्हणतात. अशा या योग्य नियोजन, आधुनिकतेचा थोडा स्पर्श असलेल्या ऊस उत्पादनात एका देठाला आता पर्यंत १४ ते १५ ऊस आहेत आणि ते शेवटपर्यंत ४० ते ४५ कांड इतके होतील असं विनायक यांनी सांगितलं. त्याचं सोबत पूर्ण 2 एकर मध्ये निसर्गाची साथ लाभल्यास २०० टन उत्पन्न येऊ शकतं असं देखील ते म्हणतात.

ऊस उत्पादकांना/ शेतकऱ्यांना सल्ला  :

  विनायक यांचं BCS computer science, M. com post graduation इतकं शिक्षण झालेले आहे. जॉब करुन ते शेतीही पाहतात. ते म्हणतात, बहुतेक शेतकऱ्यांचे म्हणणे असते की, शेतीमध्ये परवडत नाही,  इन्कम मिळत नाही, उत्पादन होत नाही. तर योग्य पद्धतीने तुम्ही जर शेतीकडे लक्ष दिलं तर शंभर टक्के फायदा होईल असा सल्ला त्यांनी दिला. आधीच्या काळात प्रथम शेती, मग नोकरी, मग व्यवसाय असा क्रम होता. कालांतराने हा क्रम प्रथम व्यवसाय, नंतर नोकरी, मग शेती असा होत गेला. शेती ही तृतीय दर्जाला गेली आणि त्याच सोबत लोकांची कष्ट घ्यायची मानसिकता ही राहिलेली नाही. त्यांना सगळं आयात पाहिजे. ‘दे रे हरी पलंगावरी’ अशी गत झाली आहे. त्यामुळे प्रामाणिक कष्ट केलं तर हमखास यश मिळणार. शेती ही काळाची गरज आहे आणि मेहनत केली अपेक्षित यश मिळेल असे देखील विनायक सांगतात. आपल्याला आधी येणाऱ्या उत्पादनाची सरासरी माहिती पाहिजे त्यानुसार आपण खर्च केला पाहिजे अस त्यांचं मत आहे. जर आपण भरमसाठ खर्च केला काहीही नियोजन न करता तर आपल्याला नुकसान होणं अपेक्षित आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून आपण शेतीकडे वाटचाल करावी अस विनायक सांगतात.

एका यशस्वी पुरुषाला स्त्रीची भक्कम साथ असतेच!

अशीच साथ विनायक यांना त्यांच्या पत्नीची आहे. माझे कष्ट कमी पण त्यांच्या पत्नीचे कष्ट जास्त आहे अस ते म्हणतात. त्यांच्या पत्नी अंगणवाडी मतदनीस म्हणून काम करून त्यांच्यासोबत शेतीही बघतात. ते मिळून शेतात काम करतात. शेणखत, तणनाशक, शिपणी, कीटकनाशक, खुरपणी असे काम ते दोघे मिळून करतात. त्यांना जॉब आणि शेती या तारेवरची कसरत करण्याच्या प्रवासात त्यांच्या पत्नीची खूप मोलाची साथ आहे.        आजकालच्या मुलीच्या घरच्यांच्या अपेक्षा भरमसाठ असतात. घर, गाडी, शेती, फ्लॅट सर्वच पाहिजे. यावर देखील विनायक यांनी त्यांचं मत मांडलं. मुलीची कष्ट करायची तयारी असेल तर शेती असणारा तर मुलगा बघा नाहीतर नका बघू अस ते म्हणतात. जो मुलगा कष्ट करतोय, निर्व्यसनी आहे त्याला प्राध्यान्य द्या. संपत्तीपेक्षा होणार नवरा किती संस्कारक्षम आहे हे जास्त महत्वाचं आहे. असे त्यांचे मत आहे.

एकेरी शंभर टन ऊस उत्पादन; असे केले सुधारित व्यवस्थापन!