मित्रांनो, तुम्हाला तर ठाऊकच आहे की भारतीय जातीवंत गाई पुर्वी भरपूर होत्या. गाई हा माणसाने माणसाळलेला पहीला मोठा प्राणी. पुरातत्व खात्याच्या संशोधनात आज लुप्त झालेल्या अनेक गायांचे अवशेष सापडले गेले. विविध आक्रमणे, विविध गायांच्या जातींच्या वैशिष्ट्यांबद्दल अज्ञान , नंतर जगभर जास्तीत जास्त दुध उत्पादन देणाऱ्या विदेशी गायांचा झालेला प्रसार, ह्यामुळे मुळच्या भारतीय प्रजातीच्या गायांकडे दुर्लक्ष होत गेलं आणि त्यातल्या काही नामशेष झाल्या. त्यातही गीर, सहीवाल, राठी इत्यादी गाईंच्या जाती आजही टिकून आहे. सध्या भारतीय प्रजातींच्या गाईंच्या संगोपना बद्दल, त्यांना प्राधान्य देण्या बद्दल शेतकऱ्यांमधे जागृती होते आहे. काही शेतकरी असेही आहेत ज्यांनी एच एफ किंवा जर्सी गायांना विकून भारतीय गाईंचे पालन सुरु केले आहे आणि इतरांना ही तसे संगोपन करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. सरकारी पातळीवरही देशी गायांचे दुग्धोत्पादन वाढवण्यासंबंधी नवेनवे प्रयोग करुन संशोधन सुरु आहे. नुकताच सरोगसी पध्दतीने एकाच गाईच्या मार्फत अनेक गायांचे निर्माण करण्याचे तंत्र यशस्वी झाले आहे.
आज आपण सांगलीच्या आटपाडी मधील अश्या शेतकऱ्याकडे आलो आहोत ज्यांनी वडिलोपार्जित नाद म्हणून किंवा आवड म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटकात आढळणाऱ्या आणि आता दुर्मिळ होत चाललेल्या खिल्लार जातीच्या बैलाचे संगोपन केले आहे.
ह्यांच नाव आहे मजिर यासीन शेख. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गाय न पाळता ह्यांनी खिल्लार बैल का पाळला असावा? आता तर बैलगाडी शर्यत ही बंद आहे. त्यात खिल्लार गाय ही काही दुग्धोत्पादन करण्यासाठी फार प्रसिद्ध नाही. मग असं असताना खिल्लार बैल पाळून काय मिळणार आहे?

पण आता परीस्थिती बदलते आहे. भारतीय प्रजातीच्या गाईंचे पालन करण्याबद्दल जनजागरण सुरु आहे. खिल्लार प्रजातीची संख्या वाढवायची असेल तर त्यांचे संकरण जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे. आणि आता खिल्लार चे संकरण करण्यासाठी उत्तम प्रतीचे खिल्लार बैल गरजेचे आहेत. नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतनासाठी आता ह्या बैलांना मागणी आहे. आपल्या गाई ह्या बैलां मार्फत भरवून कालवडी जन्माला घालायला आता व्यावसायिकांनी सुरुवात केली आहे. ह्या कालवडी आता चांगल्या किंमती विकल्या जाऊ लागल्या आहेत हा ही अनुभव अनेक व्यावसायिक सांगतात. ही खिल्लार प्रेमींसाठी खरंतर आनंदाची बातमी आहे. म्हणजेच खिल्लार गायांचा देखील आता दुग्धोत्पादनात फायदा होईल असं आशेचं चित्रं बघायला मिळू शकतय. त्यात गीर गायांप्रमाणेच खिल्लारच्या दुग्धोत्पादन प्रमाणात वाढ कशी करता येईल याचे संशोधन लवकरात लवकर सुरु व्हावे अशी आशा करुया
मजिर शेख ह्यांनी खिल्लार पाळला तो काही आताचा नाद नाही. त्या आधी त्यांच्या वडीलांनी आणि त्यांच्या वडीलांच्याही आधी त्यांच्या आजोबांनी खिल्लार पाळलेला आहे. खिल्लार ही त्यांची लाडकी जात आहे. एकेकाळी हा बैल पाळणं ही प्रतिष्टेची गोष्ट होती. शेतकऱ्याची शान त्यात असायची. पण आता खिल्लाएर फार कोणी पाळत नव्हतं.
शेख ह्यांनी तरीही खिल्लारच पाळला आणि ह्याचा त्यांना पश्चाताप होईल अशी वेळ खिल्लार ने त्यांच्यावर आज पर्यंत येउ दिली नाही.
त्यांच्याकडे खिल्लार जातीचे दोन बैलं आहेत. दोघांचाही ते नैसर्गिक किंवा कृत्रीम रेतणासाठी वापर करतात.