मित्रांनो, ग्रेट महाराष्ट्रने गेल्या काही दिवसां पासून गाय म्हशी यांना होणाऱ्या विविध आजारांवचे पारंपारिक उपचार काय आहेत ह्याबद्दल माहिती आणि मार्गदर्शन देणारे व्हिडीओज तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहोत. आम्ही आशा करतो की आमच्या पशूपालक मित्रांना ह्याचा फायदा होईल.
तुम्ही जर गोठा मालक असाल तर तुम्हाला ठाऊक असेल की जनावरांच्या तोंडाला संसर्ग होणं आणि त्यात जखमा होणं ही समस्या वारंवार होत असते. आजचा आपला व्हिडीओ ह्याच संदर्भात माहिती पुरवणारा आणि त्यावर पारंपरिक उपचार काय करता येतात ह्यावर आहे.
त्याआधी ह्या समस्ये विषयी थोडी माहिती घेऊया.
जनावरांना अधाशीपणे चारा खाण्याची सवय असते. चारा खाताना एखादी तार, सुई, खिळा, पत्रा किंवा कोणतीही जखम करू शकणारी वस्तू चाऱ्यात असल्यास तोंडात जखम होऊ शकते. काही भागांत जनावरांना उसाचे वाढे चारा म्हणून देतात, अशा हिरव्या वाढ्यांमुळेही तोंडात जखमा झाल्याचे आढळते. त्याचप्रमाणे कडक, न चावल्या जाणाऱ्या चाऱ्यामुळे तोंडात जखम होऊ शकते. लाळ्या खुरकूत, तोंड येणे व बुळकांडी अशा रोगांतही तोंडात व्रण तयार होतात. तोंडातील मऊ त्वचा मृत होऊन गळण्यास सुरवात होते. बऱ्याच वेळा क्षारांच्या कमतरतेमुळे किंवा सवय म्हणून मोठ्या- जनावरांनाही अखाद्य वस्तू उदा. खडे, चामडे चघळण्याची सवय असते, त्यामुळे तोंडात जखमा होतात व व्रण तयार होतात.

तोंडात जखम झाल्यावर जनावर लाळ गाळते, जनावरास चारा खाता येत नाही, वेदना होतात, तोंडातील जखमांवर रोगजंतूंचा प्रादुर्भाव होतो व तोंडाची दुर्गंधी येते. अन्न न घेतल्याने जनावर भुकेलेले राहते, वजन घटते, उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. बऱ्याच वेळा तोंडातील जखमांमधून रोगजंतूंचा प्रादुर्भाव होऊन लाकडी जीभ किंवा तोंडात बेंड, गळू येणे असे प्रकारही होऊ शकतात.
आता ह्यावर काय पारंपरिक उपाय करता येतो ते पाहुया.
ह्या उपचारासाठी १० ग्रॅम जिरे, तेवढेच मेथीदाणे आणि काळे मिरे, साधारण १० ग्रॅम च हळद,लसणाच्या चार पाकळ्या, एक ओले खोबरे, १२० ग्रॅम गुळ अशी सामग्री लागेल.
आता जिरे मेथी, मिरे २० ते ३० मिनीटे पाण्यात भिजत ठेवा. हे झाल्यावर वरील सर्व मिश्रण एकत्र करा. आणि त्याची पेस्ट बनवा. नारळ संपूर्ण किसून पेस्ट मधे टाका मिश्रण एकजीव करा.
पेस्ट नारळ, आणि गुळ ह्यांचे लहान गोळे करा, जनावरांच्या तोंडावर, जिभेवर, टाळूवर हाताने ३ ते ५ दिवस लावा.
तर मित्रांनो, ही होती जनावरांच्या तोंडाच्या जखमांची कारण आणि त्यावरच्या पारंपरिक उपचारां विषयी संपूर्ण माहिती. हे माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा. आणि माहिती ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ही नक्की पोहोचवा