गव्हाची लागवड कशी केव्हा आणि कोणत्या पद्धतीने केली जाते ?

मित्रांनो, गहू हा भारतीय लोकांच्या आहारातील एक महत्वाचा अन्नघटक आहे. गव्हाचे सेवन आरोग्यदायी आहे हे आता मान्य झालेले आहे. भारताचे एकूण अन्नधान्य उत्पन्नापैकी गव्हाच्या उत्पन्नाचा वाटा तीन टक्के आहे. भारताचे शेती क्षेत्र बघता हे तीन टक्केही खूप आहेत. हरित क्रांतीच्या यशस्वी होण्यामागे गव्हाच्या पिकाचा ही मोठा वाटा आहे. म्हणजे अर्थातच गहू हे अनेक महत्त्वाच्या पिकांपैकी एक पीक आहे.
आज आपण जाणुन घेउया गव्हाची लागवड कशी केव्हा आणि कोणत्या पद्धतीने केली जाते.
सर्वात आधी पाहुयात गव्हाच्या पिकासाठी जमीन कशी लागते.
गव्हासाठी भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी लागते. हलक्या आणि मध्यम जमिनीतही गव्हाचे पीक घेता येते पण त्यासाठी भर खते टाकावी लागतात. जिरायत गहू घ्यायचा असेल तर तो पाणी धरून ठेवणाऱ्या भारी जमिनीत घ्यावा लागतो.
मित्रांनो गहू हे रब्बी पीक आहे. त्याची लागवड ऑक्‍टोबरच्या दरम्यान होते. बागायती जमिनीत गहू घ्यायचा असेल तर तो नोव्हेंबरमध्ये घ्यावा लागतो. त्याआधी जमीन मशागत करून ठेवावी लागते.

आता प्रथम पाहूया पेरणी कशी केली जाते. दोन ओळींमध्ये 22.5 ते 23 सेंटीमीटर असे अंतर ठेवून पेरणी केली जाते. पाच ते सहा सेंटीमीटर पेक्षा खोल गव्हाचे बी पेरले जात नाही. पेरणी एकेरी पद्धतीने करावी, उभी-आडवी करू नये. अशा पेरणीमुळे आंतरमशागत करणे सोपे जाते. म्हणजेच पेरणी बरोबरच रासायनिक खतांची मात्रा देणे सोपे जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन 2.5 ते तीन मिटर असे सारे पाडावेत आणि आडव्या दिशेने पाट पाडावेत.
आता पाहूया गव्हाच्या पिकासाठी कोणते बियाणे वापरावे. गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी एका हेक्टरला 20 ते 22 लाख झाडे असणे आवश्यक आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये पेरणी करत असाल तर एकशे पंचवीस ते दीडशे किलो बियाणे वापरावे.
पेरणी करताना दोन झाडांमधील अंतर 18 सेंटिमीटर इतके ठेवावे. जिरायती गहू असेल तर त्यासाठी 70 ते 100 किलो बियाणे प्रति हेक्‍टरी वापरावे आणि पेरणी करताना झाडांमधील अंतर 22 सेंटीमीटर किती ठेवावे.
गहू पिकासाठी विविध वाण प्रचलित आहेत. कोरडवाहू गव्हासाठी एन 59, एम ए सी एस 1967, एन आय 4539,
एक के डी डब्ल्यू 2997 -16 (शरद).
तर बागायतीसाठी एचडी 2380, एम ए सी एस 116, एचडी 2189, पूर्णा म्हणजेच एके डब्ल्यू 1079, एम ए सी एस 2846, विमल म्हणजेच एके डब्ल्यू 3722,
तसेच बागायती उशिरा पेरणीसाठी,एकेडब्ल्यू ३८१, एच आय ९९९, एचडी २५०१, एके डब्ल्यू 1079, एनआयएडब्ल्यू ३४, तसेच लोकवन या वाणांची लागवड ची लागवड केली जाते.

गव्हाची लागवड कशी केव्हा आणि कोणत्या पद्धतीने केली जाते ?

पेरणीनंतर 30 ते 40 दिवसांनी अंतर मशागत करावी. यावेळी तणांचे प्रमाण लक्षात घेऊन तणांचा बंदोबस्त करावा. खुरपणी करावी आणि तणनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा. तणनाशकांची फवारणी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी करावी.
आता पाहूया खतांची मात्रा कशी द्यावी. कुळवाच्या पाळ्या देताना हेक्‍टरी 25 ते 30 गाड्या शेणखत मिसळून द्यावे. बागायती पेरणीसाठी हेक्‍टरी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर 30 दिवसांनी जेव्हा खुरपणी कराल तेव्हा उरलेले नत्र द्यावे.
पेरणी उशिरा करत असाल तर हेक्टरी 80 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. ही खतांची मात्रा दोन हप्त्यात द्यावी.
जिरायत गहू असेल तर पेरणीच्या वेळी हेक्‍टरी 40 किलो नत्र 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश द्यावे. पेरणीपूर्वी बियाण्यावर अँझोटोबँक्टर आणि सफुरद विरघळविणा-या जीवाणुंची २५० ग्रँम प्रती १० किलो याप्रमाणे बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी.
आता पाहू या उद्योगाच्या पिकासाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे.
बागायती वेळेवर पेरणी आणि उशिरा पेरणी यानुसार आणि जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याचे व्यवस्थापन केले जाते.
पाण्याचा साठा कमी असेल म्हणजे एकदाच पाणी देता येईल इतकेच असेल तर पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी पाणी द्यावे. आणि पाण्याचा साठा दोन वेळा देता येईल इतका असेल तर पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी पहिली पाळी आणि 60 दिवसांनी दुसरी पाळी अशा पद्धतीने पाणी द्यावे. आणि पाण्याचा साठा मुबलक असेल तर 20 ते 22 दिवसांनी पहिली 40 ते 45 दिवसांनी दुसरी आणि 60 ते 65 दिवसांनी तिसरी पाळी द्यावी.
आता गव्हाचे पीक टप्प्याटप्प्याने कसे वाढते ते बघूयात.
पेरणी केल्यानंतर 18 ते 21 दिवसात मुकुट मुळे फुटतात.
30 ते 45 दिवसानंतर कांडी धरली जाते. 60 ते 65 दिवसात पिक ओंबीवर येते. आणि 80 ते 85 दिवसात पाणात चिक भरले जाते ‌

गहू हे पीक सर्वात जास्त बळी पडते ते किडीला. आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की गहू हे बागायत‌ आणि जिरायत अशा दोन्ही प्रकारे पिकवले जाते.
महाराष्ट्रात गव्हाच्या पिकावर पडणारी कीड म्हणजे खोड किडी,तुडतुडे,मावा वाळवी इत्यादी किडीचा त्रास होतो. तसेच उंदीर या प्राण्याचा देखील बराच त्रास गव्हाच्या पिकाला सोसावा लागतो.
खोड किडीचे पतंग तपकिरी रंगाचे व गवती रंगाचे असतात. पुर्ण वाढ झालेली अळी सुमारे २-३ से.मि असुन तिचा रंग गुलाबी असते. ती अंगाने मु आणि डोके काळे असते. या किडीच्या प्रादुर्भावाने वाढणारा मधला भाग सुकुन जातो. ती  खोडात शिरुन खालील भागावर उपजिवीका करते. त्यामुळे रोपे सुकुन जातात. व त्यांना ओंब्या येत नाही.
या किडींच्या नियंत्रणासाठी  उभ्या पिकातील किडग्रस्त झाडे आठवड्याचे अंतराने २-३ वेळा मुळासकट उपडुन नाश  करावा. तसेच पिकाखाली फवारणी झाल्यावर उपद्रवग्रस्त शेतातील धसकटे एकत्र करुन जाळावित. उभ्या पिकतात पिक पोटरीवर येण्याचे सुमारास हेक्टरी २ किलो कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

दुसरा प्रकार म्हणजे तुडतुडे. हे किडे आकाराने लहान असतात. हे पानातील रस शोषून घेण्याचे काम करतात. त्यामुळे पानांना पिवळा रंग पडू लागतो.
या किडीचे नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसुन आल्यावर डायमेखोएट ३० टक्के प्रवाही ३०० मिली. किंवा मिथाईल डिमेटाईल २५ टक्के प्रवाही ४०० मिलि किंवा पेन्थीऑन ५० टक्के २०० मिलि. किंवा कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी १ किंलो प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी किंवा कार्बारील १० टक्के भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात घरळावी. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी /धुरळणी १५ दिवसानी वरीलप्रमाणे करावी.
तसेच गव्हावर मावा या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास तुडतुडे साठी जे उपाय करतात तेच उपाय करावे.

तर पिकाच्या वाढीच्या अवस्थेत असतानाच वाळवीचा धोका संभवतो. वाळवी सगळ्यांनाच ओळखता येते.
वाळवाचा बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली वारूळे खणुन काढावित. व त्यातील राणीचा नाश करावा. वारुळ नष्ट केल्या नंतर जमीन सपाट केल्यानंतर मध्भागी सुमारे ३० से.मि. खोलवर एक छिद्र करावेत. आणि त्यात क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही हे किटकनाशक १५ मिलि. १० लिटर पाण्यात मिसळुन वारुळात वापरावे. वरील औषधाचे मिश्रन ५० लिटर एका वारुळासाठी पुरेसे होते. किंवा क्विनडलफॉस ५ दजाणेदार किंवा फोरेट १० टक्के दाणेदार किंवा कार्बोफ्युरॉन ३ % दाणेदार हेक्टरी २५ किलो जमिनीत टाकावे. आथवा शेनखताबरोबर द्यावे.

आता पाहू या रोगांचे व्यवस्थापन.
गव्हावर तांबेरा, पानावरचा करपा काजळी हे रोग प्रामुख्याने उद्भवतात.
तांबेरा या रोगात रोपांवर नारंगी रंगाचे पुढे येतात. हा एक बुरशीजन्य रोग आहे. हा रोग टाळण्यासाठी याला प्रतिबंधक वाणांचा वापर करावा. जसे की  एचडी २१८९, पूर्णा, एकेडब्ल्यू ३८१ व एचआय ९७७.
तांबे-याची लागण दिसताच मॅन्कोझेब (डायथेन एम ४५) हे बुरशीनाशक २५ ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेउन  १० ते १५ दिवसांचे अंतराने फवारण्या कराव्यात.

काजळी हा रोग बियाणां द्वारे पसरतो. रोगाट ओंब्यामध्ये दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास व्हिटॅव्हॅक्स किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची २.५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बिज प्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत..
गव्हावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचे प्रादुर्भाव दिसताच मॅन्कोझेब हे बुरशीनाशक २५ ग्रॅम + १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.

Leave a Comment