द्राक्षावरील किड आणि रोगाचे व्यवस्थापन…

शेतकरी बंधुंनो आणि भगिणींनो, तुम्ही जर द्राक्षाची शेती करत असाल तर तुम्हाला त्यावर पडणाऱ्या किड आणि रोगाचे व्यवस्थापन कसे करायचे हा प्रश्न सतावतोच. काही शेतकरी जे वर्षानुवर्षे द्राक्ष लागवड करत आहेत त्याना आता द्राक्षावरील किड आणि रोगाचे व्यवस्थापन करण्याचा अनुभव आला असेलच. पण नव्याने ज्या शेतकऱ्यांनी द्राक्ष लागवडीला सुरुवात केली असेल त्यांना ह्याविषयी माहिती घ्यावी असं नक्कीच वाटत असणार.
अश्या शेतकऱ्यांसाठी आहे आजचा हा व्हिडिओ.
आज आपण पाहणार आहोत द्राक्षावरील किडी आणि रोगांचे व्यवस्थापन कसे करावे.
द्राक्ष बागेत प्रामूख्याने, करपा, भुरी, केवडा, तांबेरा अशा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. तसेच अपुरा पाऊस झाला की मिलीबग हा रोग आणि खोडकिडा हा किड्याचा प्रकार वाढीस लागतो.
ह्या रोगांना आणि किडींना आळा घालण्यासाठी बागायतदार छाटणी नंतर रासायनिक घटकांचा जास्त वापर केला जातो. एरव्ही हा वापर काही प्रमाणात उपयोगी असतो पण पाऊस कमी असण्याच्या काळात जैविक घटकांचा वापर करण्याचा सल्ला तज्ञ देतात.

आता पावसाळ्यात मिलीबग ह्या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून आला की बागायतदार इमिडाक्‍लोप्रिडसारख्या फॉर्म्युलेशन्सचा वापर ड्रेंचिगसाठी करताना दिसून येतात. पण मिलीबग च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मिलीबग व खोडकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी व्हर्टिसिलीयम लेकॅनी, मेटारायझिम ऍनिसोप्ली, बिव्हेरिया बॅसियाना यांसारख्या जैविक बुरशीजन्य कीडनाशकांचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. आर्द्रतायुक्त वातावरणात या बुरशीजन्य कीडनाशकांची वाढ किडींच्या शरीरावर चांगल्या प्रकारे होते. ही बुरशीजन्य कीडनाशके वापरण्यापूर्वी गुळाच्या पाण्याची प्रक्रिया केल्यास अधिक फायदा मिळतो. बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझियम या बुरशीच्या वापरामुळे खोडकिडीच्या प्रौढावस्थेचा चांगला बंदोबस्त होऊ शकतो. व्हर्टिसिलीयम लेकॅनी व बिव्हेरिया बॅसियाना या बुरशींच्या वापरामुळे मिलीबगच्या अवस्थांचा नाश होऊ शकतो. निमोरिया रायली, बिव्हेरिया बॅसियाना या बुरशीमुळे बागेतील तणांवरील अळ्यांचा बंदोबस्तदेखील चांगल्या प्रकारे होतो.

द्राक्षावरील किड आणि रोगाचे व्यवस्थापन...

आता पाहूया भुरी या रोगाचा प्रादुर्भाव कसा रोखावा. मे महीन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जुनच्या पहील्या आठवड्यापर्यंत आपल्याला भुरीचा प्रादुर्भाव जाणवू लागतो. भुरी रोगाची लक्षणे दिसू लागताच ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबटिलीस, सुडोमोनास फ्लुरोसन्स, ऍम्पोलोमायसिस क्विसकॅलिस यांसारख्या जैविक घटकांचा वापर करावा. त्यामुळे रोगांचे चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकते.
पुढे वेल वाढू लागते तेव्हा काडी परीपक्व होत जात असतांना आलेल्या नव्या फुटींवर डाउनी रोग वाढण्याची श्यक्यता असते. डाउनी च्या नियंत्रणासाठीही भुरीसाठी जी जैविक घटके वापरली जातात तीच वापरावी.
ट्रायकोडर्मासारख्या जैविक बुरशीनाशकाचा जमिनीतून वापर करावा. त्यामुळे बोदावर टाकलेल्या काड्या, शेणखत, पाचटाचे मल्चिंग, काडीकचरा इत्यादी पदार्थ कुजताना त्यातील रोगग्रस्त अवशेष नष्ट होतात. काडीकचरा कुजल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. बागेतील बोद भुसभुशीत होऊन पांढरी मुळी कार्यक्षम राहते.

करपा रोग हा जुन ते ऑक्टोबर ह्या काळात पसरण्याची श्यक्यता असते. ह्या रोगामुळे फळावर काळसर, खोलगट चट्टे पडतात.पानांवर गोलाकार काळे ठिपके पडून पाने भुरकट राखी रंगाची होतात तसेच आकाराने वेडी वाकडी व्हायला लागतात. ह्या रोगाची लागण एकदा झाली तर त्याच्या नियंत्रणाचे उपाय करून फार काही होत नाही. त्यामुळे ह्या रोगासाठी प्रतिबंधात्मक उपायच महत्वाचे असतात. म्हणजेच द्राक्षबाग स्वच्छ ठेवावी. पावसाळ्यापुर्वी वेलीचा रोगट भाग काढून जाळून टाकावा. एप्रिलच्या छाटणीनंतर नवीन फुटीवर 5:5:50 तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारावे. नंतर ताम्रतुक्त बुर्शीनाशकांची वेळोवेळी फवारणी करावी.

तसेच केवडा हा रोग दमट हवामानात पसरणारा रोग आहे. पाने आणि कोवळ्या फांद्यांवर ह्याची वाढ झपाट्याने होते. ह्यात पानांवर फिकट हिरवे किंवा पिवळट पारदर्शक डाग पडतात. पेशी मरुन पाने मुर्दाड व्हायला लागतात. फुलाऱ्याच्या अवस्थेत आणि लहान फळांवर हा रोग झाला तर फळे जळल्यासारखी दिसतात. ह्या रोगाची बुर्शी बरेच दिवस लपुन, तग धरून राहते, आणि तीला अनुकल वातावरण मिळताच पुन्हा पानांवर पसरु लागते.
ह्याचा उपद्रव टाळण्यासाठी बाग स्वच्छ ठेवावी, रोगट कापून जाळून टाकावा, एप्रिल छाटणीनंतर नवीन फुटीवर 5:5:50 बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. पावसाळ्यात बोर्डो मिश्रणाच्या दोन तीन फवारण्या कराव्यात. ऑक्टोबर छाटणीनंतर 1:1:50 बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. दोन आठवड्यांनी पुन्हा 2:2:50 तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारावे. नवीन वाढीची फूट 15 ते 20 सेंमी लांबीची झाल्यावर त्यावर 5:5:50 तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारावे. यानंतरच्या काळात वेगवेगळ्या ताम्रयुक्त बुरशीनाशकाची आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

ह्या शिवाय उड्द्या भुंगेऱ्याचा त्रास ही द्राक्ष बागेला होतो. ह्या भुंगेऱ्याची रंग पिंगट, तांबे आणि ब्रॉंझ धातू सारखा असतो. हे आकाराने अत्यंत लहान असतात. तसेच बाह्यवर्तुळाकार, बहीवक्र आणि पंखावर ५-६ काळे तांबट ठिपके असतात.

ह्या किड्याची मादी मार्च ते ऑक्टोबर ह्या दरम्यान खोडावरील सालीमधे पुंजक्याच्या स्वरूपात अंडी घालते.
अंडी पांढऱ्या पिवळ्या रंगाची आणि आकाराने लांब असतात. ही मादी २५० ते ५०० अंडी देते. ४ ते आठ दिवसात अंडी पिकून पिवळी अळी बाहेर येते. ह्या अळ्या जमिनीखालील १८ सें. मी. मुळांचा शोध घेऊन खोडांच्या साली खातात. अळीचा भुंगेरा ८ ते १२ महीन्यात प्रौढ होतो आणि पाने खाउन जिवंत राहतो. कोवळ्या फुटींवर हे भुंगेरे सकाळी, संध्याकाळी आणि रात्री अक्षरशः तुटून पडतात. फुटी गळू लागते. कधी पानांचे केवळ देठच शिल्लक राहते. अळी मुळांवर जगत असल्याने पाने कोरडी पडू लागतात.
ह्या किडी मुळे ५० टक्के नुकसान झाल्याची माहिती आहे.

ह्या वर उपाय म्हणून मुळाच्या भागात असणाऱ्या अळ्या सुर्यप्रकाशात आणण्यासाठी जमीनीची वेळोवेळी चाळणी करावी. गवत, वाढू देवू नका. पडलेली पाने बागेबाहेर जाळून टाकावी. उडद्या भुंगेऱ्यांची संख्या कमी करण्याकरिता कोषांची संख्या कमी करावी लागते. याकरिता बागेला पाणी द्यावे.
जमिनीमध्ये जैविक नियंत्रणासाठी सूत्रकृमी (ईपीएन), हेट्रोरेबीडीटिस इंडिकस यांचे ड्रेंचिग करावे. त्यानंतर पुन्हा परत बागेला पाणी द्यावे.

तर मित्रांनो ही होती द्राक्ष रोग व किडी नियंत्रण विषयी संपूर्ण माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा.

Leave a Comment