कांद्यावर पडणारे विविध रोग…

मित्र मैत्रीणींनो, कांदा हे एक महत्वाचं पिक आहे. महाराष्ट्र कांदा उत्पादन आणि निर्यातीत अग्रस्थानी आहे. काही महीन्यांपुर्वीच कांद्याचे भाव बरेच वाढले होते. अगदी किलोला दिडशे रुपये ह्या भावात ग्राहकांपर्यंत तो विकला जात होता. आता ह्याचा कितपत फायदा शेतकऱ्यांना झालाहा शोधाचा विषय आहे. असो. तर मुद्दा असा आहे की भाव काहीही असला तरी कांदा पिक घेणं शेतकरी थांबवत नाही कारण कांद्याची मागणी काही कमी होत नाही. जवळजवळ सर्वच भाज्यांमधे कांदा वापरलाच जातो.

पण कांदा लागवड करणाऱ्यांना त्याच्यावर पडणाऱ्या रोगाचा सामना करावा लागतो. हे किड आणि रोग वेळीच ओळखले आणि हाताळले गेले नाहीत तर शेतकऱ्याला मोठं नुकसान सोसावं लागतं. उत्पादनावर त्याचा परीणाम होतो. तर ह्याचसाठी आज आपण जाणून घेणार आहोत कांद्यावर पडणारे विविध रोग आणि त्यांच्या प्रतिबंधाचे आणि उपचाराचे उपाय.

जांभळा करपा- हा रोग पिकांचे सर्वात जास्त, म्हणजे ५० ते ७० टक्के नुकसान करतो. ह्याची लक्षणे म्हणजे पानांवर फुलांवर लांबट असे पांढरे ठिपके पडतात आणि नंतर नंतर ते जांभळट होत जाऊन शेवटी काळे पडत जातात. पुढे हा पसरत जातो आणि पिक व्यापून टाकतो. रब्बी कांदा लावला असेल आणि त्यातच जर जानेवारी फेब्रुवारी महीन्यात जर ढगाळ वातावरण झाले किंवा पाऊस झाला तर ह्या रोगाचा त्रास जास्त वाढतो.
ह्यावर उपाय म्हणजे उन्हाळ्यात नांगरट करुन जमीन चांगली तापू द्यावी आणि पिकांची फेरपालट करावी. प्रती दहा लिटर पाण्यात मॅन्काझेब २५ ग्रॅम इतके मिसळून रोपांच्या उगवणीनंतर ३० दिवसांनी, नंतर ४५ आणि ६० दिवसांनी फवारणी करावी. तसेच थायरम बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. खबरदारी म्हणून नत्रयुक्त खताचा जास्त वापर करु नये तसेच नत्र खत द्यायला फार उशीरही करु नये. तसेच पेरणीपूर्वी पेरणीपूर्वी बियाणांना कार्बेंडाझीम २ ग्रॅम सोबत कॅप्टन २ ग्रॅम देउन बीजप्रक्रिया केल्यास करपाला प्रतिबंध करता येतो.

काळा करपा – खरीप हंगामातल्या कांद्याला काळा करपा रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो. बुडख्याजवळ आणि पानांवर राखाडी रंगाचे ठिपके पडू लागतात. नंतर त्यावर उबदार आणि बारीक ठिपके पडतात. ते वाढत जाऊन पाने काळी पडतात आणि शेवटी रोपे मरतात.
उपाय म्हणून प्रती दहा लिटर पाण्यात मॅन्काझेब २५ ग्रॅम इतके मिसळून फवारणी करावी.
पिकाच्या जमीनीत पाणी साचून राहणार नाही आणि पाण्याचा निचरा होईल ह्याची काळजी घ्यावी.
रोपां ची लागवड गादी वाफ्यावर करावी.

कांद्यावर पडणारे विविध रोग...

तपकीरी करपा- तापमान १५ ते २० अंश सेल्सियस च्या खाली गेले किंवा मार्च – एप्रिल महीन्यात पाऊस झाला तर ह्या बुरशीयुक्त रोगाचे प्रमाण वाढते. पानांवर तपकिरी चट्टे पडू लागतात. नंतर त्यांचा आकार वाढत जातो आणि रोपे सुकत जातात.
ह्यावर उपाय म्हणून प्रती दहा लिटर पाण्यात मॅन्काझेब २५ ग्रॅम इतके मिसळून फवारणी करावी. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिकांची फेरपालट करावी. पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल असे व्यवस्थापन करावे. बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
दर १५ दिवसांच्या अंतराने २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा हेक्झेंकोनॅझोल १0 मिलि किंवा प्रोपिकोनेंझोल १0 मिलि प्रति १0 लिटर पाणी घेऊन रोपाचे स्थानांतर केल्यानंतर ३o दिवसांनी ३ ते ४ फवारण्या कराव्यात.

मर रोग- ह्या रोगात पिक पुर्ण कोलमडून पडू लागते. होतं असं की आपण जेव्हा बी पेरतो तेव्हा बुरशीचे तंतुमय धागे रोपांच्या जमीनीलगतच्या भागात लागून पिक कमजोर करतात. ह्यात रोपे पिवळी पडतात आणि रोपांचा जमीनीलगतचा भाग मउ पडतो आणि रोपे कोलमडू लागतात. काही वेळेला हा रोग जास्त वाढला की पिकाचे ८० ते ९० टक्के नुकसान करु शकतो. मर झालेल्या रोगाच्याच जागी पुढील वर्षी पिक घेतले तर हा रोग आणखी जोमाने वाढतो.
ह्यावरचा उपाय म्हणून पेरणीपूर्वी बियांना कॉबॉक्सिन हे औषध २ ते ३ ग्रॅम प्रतिकीलो ह्या प्रमाणात चोळावे.
कांद्याच्या पिकाला पाण्याचा चांगला निचरा होणं महत्वाचं आहे. त्यामुळे बुरशीमुळे होणारे बरेच रोग वेळे आधीच थांबवता येतात. म्हणून कांदा लागवड नेहमी गादी वाफ्यावर करावी. गादी वाफ्यात पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो.
तसेच पुढच्या लागवडीच्या वेळेस रोपवाटिकेची जागा बदलून लागवड करावी.
ह्या उपायां नंतरही जर रोगाची लागण झाली तर कॅप्टन ३० ग्रॅम घेऊन प्रती १० लिटर पाण्यात मिसळून ओतावे.
लागवड करण्याकरिता श्यक्यतो रोगप्रतिकारक जातीची निवड करावी. शेतात पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल ही काळजी घ्यावी.

तसेच कांद्यावर फुलकिड सुध्दा पडते. मादा आणि पिल्ले पाने कुरतडून त्यातला रस शोषून घेतात. त्यामुळे पानांवर पांढरे ठिपके पडू लागतात. दिवसा तापमान वाढले की ही किड पानाच्या बेचक्यात किंवा गवतामधे खोलवर लपून राहते. पांढरे ठिपके वाढत जाऊन एकमेकांना जोडले जातात आणि त्यामुळे पाने वाकले जाऊन कोलमडू लागतात. ह्या किडीच्या जखमांमधुन करपा रोग वाढीस लागतो.

ह्यावर उपाय म्हणून लागवडीपुर्वी रोगप्रक्रिया करुन घ्यावी. लागवडी नंतर च्या ३० दिवसांनी ६० ते ७० टक्के आद्रता असतांना व्हर्टिसिलियम लॅकेनी प्रतिलिटर ५ गॅम ह्या प्रमाणात पाण्यात मिसळुन आठ ते दहा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्या.
फवारणी करताना चिकट द्रवाचा वापर नेहमी करावा.
पाच टक्के निंबाळी अर्काची फवारणी करावी.
रोपांच्या लागवडीनंतर फॉफेट १० जी किडनाशक
तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिकांची फेरपालट करावी आणि शेतांच्या कडेने मक्याच्या दोन ओळींची लागवड करावी. एकरी चार किलो ह्या प्रमाणात वाफ्यात टाकावे.
फिप्रोनिल 15 मिली किंवा सायपरमेथ्रीन (25 ई. सी.) 5 मिली किंवा प्रोफेनोफॉस (50 ई. सी.) 10 मिली लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (5 ई.सी.) 5 मिली 10 लिटर पाण्यातून आलटून पालटून फवारणी करावी.

तर ही माहीती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा

Leave a Comment